DDLJ ची जादू - ३० वर्षानंतरही

 DDLJ ची जादू - ३० वर्षांनंतरही !

आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ' दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' DDLJ ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आता मागे वळून पाहताना या सिनेमाची जादू नव्याने जाणवली. या सिनेमातल्या राज आणि सिमरन बरोबरच तारुण्यातून प्रौढत्वाकडे झुकलेल्या आमच्या पिढीने का बरं हा सिनेमा इतका डोक्यावर घेतला ?

ह्या सिनेमाने चकचकीत locations, उत्कृष्ट अभिनय, indo western fusion मध्ये उलगडत जाणारी आवडेलशी (पटेलशी नाही) परिकथा समोर मांडली. अतिशय बांधीव कथा, तगडा अभिनय, योग्य दिग्दर्शन आणि त्याला मनात रेंगाळणाऱ्या सुंदर गाण्यांची जोड मिळाल्यावर, प्रेमकथा आवडणारे प्रेक्षक काही तास तरी ही जादू अनुभवायला गर्दी करू लागले.

प्रेमकथा कितीतरी आल्या, गेल्या, हिट झाल्या, पण प्रत्येकाचे असे 30 वर्षे पूर्ण होण्याचे सोहळे किंवा आठवण सुद्धा निघत नाही, त्यातच DDLJ चे वेगळेपण आहे. 

DDLJ परत प्रेमावर विश्वास ठेवायला भाग पाडतो (जरी DDLJ ची धुंदी उतरल्यावर हे फसवे आहे हे जाणवले तरीही). "मेरे ख्वाबोमें जो आये" म्हणणाऱ्या काजोलबरोबर आपल्यापैकी कितीतरी जणींनी ठेका धरला होता ना! प्रेमात पडल्यावर फक्त मनातच नाही तर अक्षरशः जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तेच माणूस डोकावू लागते, ही अवस्था " हो गया है तुझको तो प्यार सजना " ह्या गाण्यातून बघताना आपल्यापैकी किती तरी जणं गालातल्या गालात हसले होते. तिथेच केव्हातरी आपणही राज आणि सिमरनच्या कथेत गुंतायला लागतो. ध्यानीमनी नसताना, कोणताच प्लॅन नसताना, अतिशय भिन्न व्यक्ती अचानक भेटतात, चार मजेचे क्षण सर्वांबरोबर एकत्र घालवतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र नंतर ते आपापल्या वाटेने निघून जातात, अशी सरळसोट कथा असते. इथे सिनेमातला आवडणारा ट्विस्ट येतो. या भिन्न व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात, निरोप घेतल्यानंतर दोघांनाही हे जाणवते. खऱ्या आयुष्यात अशी नाजूक वळणे तिथेच सोडून देऊन, रूढ मार्गाने आपण पुढे जातो. पण DDLJ मध्ये मात्र राज सिमरनच्या मागे भारतात येतो. त्यानंतर सिमरनही ' तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम' म्हणत प्रेमाची कबुली देते. पुढे अनेक अवघड वळणे घेत प्रेमाची गाडी अखेर दोघे गाठतात हे सर्वांना माहितच आहे.

तर DDLJ चे वेगळेपण प्रेमासाठी खरंतर न पेलवणारी साहसे घेण्यात आहे, प्रेमासाठी वेडे होण्यात आहे, प्रेमाच्या जादूमय दुनियेत तुम्हांला तीन तास खिळवून ठेवण्यात आहे.

सामान्य माणसाला इच्छा असून, अशी वळणे येऊन, मोह होऊन, प्रेमामध्ये असे झपाटून जाणे, वाहून जाणे अवघड जाते, ते DDLJ करून दाखवतो.

DDLJ चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातले संवाद. शोले नंतर इतके हिट आणि लोकप्रिय झालेले संवाद फार कमी फिल्म्समध्ये आहेत. " बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती हैं " , " जा सिमरन, जा, जी ले अपनी जिंदगी", " अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलटके देखेगी, पलट... पलट.. ". DDLJ फॅन्सनी या संवादांवरही भरभरून प्रेम केले. यातले " पलट " आमच्या पिढीला तेव्हा खरेही वाटायचे, कितीजणांनी हे आजमावून पहायचा प्रयत्न केला सांगा?

मोहमयी स्वित्झर्लंड, प्रेमात झपाटून गेलेले राज आणि सिमरन, अफलातून गाण्यांची जोड, टिपिकल फिल्मी शेवट आणि प्रेमाचा झालेला विजय, हे सर्व जादुई माहोल DDLJ समोर ठेवतो. 

खऱ्या आयुष्यात शक्य नसणाऱ्या सर्व गोष्टींची सुंदर स्वप्ने DDLJ दाखवतो. स्वप्ने तरी किमान सुंदर आणि छानच असावीत. स्वप्नातही रेल्वेत उडी मारून चौथी सीट पकडणेच दिसू लागले तर त्याला स्वप्न का म्हणायचे? DDLJ प्रेमावर प्रेम करायला सांगतो, त्यातल्या अचाट, अतिरेकी, अफाट, अशक्य गोष्टी सहन करून किंवा बाजूला टाकून, काही तास तरी निखळ आनंद देऊन जातो. कदाचित हेच त्याच्या यशाचे एक मोठे कारण असावे.

© वैशाली जोशी नगरकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मला आवडलेली पुस्तकं:

तारे जमीं पर