मला आवडलेली पुस्तकं:

माझे बालपणीचे साथीदार

© गीता पलुस्कर

सप्टेंबर 10, 2007

( माझ्या एका जुन्या ब्लॉग वरील ही २००७ ची पोस्ट इथे परत पोस्ट करत आहे. )


    


वाचनाचा छंद तसा लहानपणापासून आहे. वाचताही येत नव्हतं त्या वयापासून माझ्याकडे माझी पुस्तकं होती. माझी अंकलिपी मला अजून लक्षात आहे. ‘आरूणि आणि ईतर गोष्टी’ मधल्या सर्व गोष्टी वाचता येत नसतानाही आईकडून ऐकून पाठ झाल्या होत्या. चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.


      माझ्या शाळेत , म्हणजे बालमोहन विद्यामन्दीरमध्ये , बक्षिस म्हणजे पुस्तके द्यायचीच पद्धत होती. वार्षिक परिक्षेमध्ये प्रत्येक तुकडीतल्या पहिल्या दहा नंबरांना , प्रत्येक विषयातल्या हाय्येस्ट मार्क मिळवणार्या मुलांना , अशी भरपूर बक्षिसांची रेलचेल असे. पण बक्षिसं म्हणजे कुपन्स असत. कुपन घेउन आयडियल बुक डेपोमध्ये जायचं आणि मनासारखी पुस्तकं खरेदी करायची. तिथे गेल्यावर बहुदा पैसे कमी पडायचे. मग बाबांकडून त्यात भर घालून मनसोक्त पुस्तक खरेदी व्हायची.आता लहानपणापासून असं वाचनाचं बाळकडू मिळाल्यावर वाचनाची आवड निर्माण होणं स्वाभाविकच आहे. 

     

          शालेय वयात शाळेच्या प्रोत्साहनामुळे खूप वाचायला मिळालं. माझं पहिलं वहिलं पुस्तक मला अजून आठवतंय.‘मन्दार’ नावाचं ते पुस्तक होतं, बहुतेक शैलजा राजेंच.  तिसरीत मिळालेलं; (गणितात १०० मार्कं मिळाल्याबद्दल!!!). मोठ्या चिकाटीने मी ते वाचून काढलं. घर सोडल्यावर मन्दारवर आलेल्या प्रसंगांमुळे मी अस्वस्थ झाले होते. ते पुस्तक लौकरच मी हरवलं. पुन्हा काही ते मिळू शकलं नाही. मन्दारनंतर मला वाचायचा छंद लागला तो कायमचा.


       आम्ही तिघी बहीणी. त्यामुळे तिघींची मिळून दरवर्षी कमीतकमी तीनतरी पुस्तकं असायची.  भा. रा. भागवतांची सर्व पुस्तकं शाळेच्या बक्षिसखाती जमा आहेत. सूर्यावर स्वारी , मुक्काम शेन्डेनक्षत्र , फास्टर फेणे, जयदीपची जंगलयात्रा , भुताळी जहाज , अशी अनेक पुस्तकं  आजही स्मरणात ताजी आहेत.  सूर्यावर स्वारी वाचल्यानंतर अनेक वर्ष मला वाटायचं की एखादा धुमकेतू खरंच पृथ्वीचा लचका तोडेल आणि त्यावर मी असेन तर बरं होइल. भुताळी जहाज वाचल्यावर अनेक रात्री रामनामाचा जप करत झोपले आहे. गेटवे ऑफ इंडीयाला बोटीत बसतानासुद्धा एखादं भूत दिसेल असं वाटायचं. भा. रा. भागवतांच्या बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये दूरच्या देशांची वर्णनं असायची. ती वाचून माझ्यासारखी भूगोलशत्रूसुद्धा नकाशे बघायला प्रवृत्त व्हायची, एवढा त्या पुस्तकांचा प्रभाव होता. फास्टर फेणे खरंच फुरसुंगीला रहातो असं मला वाटायचं. अजूनही मला एकदा फुरसुंगीला जायची सुप्त ईच्छा आहे.

    गोट्या , चिन्गी हे तर अगदी मित्रच होते . त्यांचे सर्व भाग वाचून काढले की परत एकदा पहील्यापासून सुरवात करायला मोकळी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदातरी ह्या सर्व मित्रांना मी भेटायची.


       शरावतीचा शोध हे ग. वि. साळवी यांचे पुस्तक, त्यातलं रोमांच अजून मनात जागं आहे. शेवटच्या प्रकरणात शरावती वायूरूपातून हळूहळू घनरूपात प्रकट होते आणि वरमाला घेऊन सलज्ज नायकापुढे ऊभी राहाते तो क्षण अविस्मरणीय आहे.हॅरी पॉटरमधल्या लॉर्ड वॉल्डेमॉर्टची तुलना मला वायूरूपात वावरणाऱ्या ‘शरावतीचा शोध’ मधल्या खलनायकाशी करावीशी वाटते . तो शरावतीला कडेकोट पहाऱ्यातून पळवून नेतो तेव्हा तिच्या खिडकीवरच्या नाजूक घंट्या मंजुळ किणकिणतात , तेव्हां सर्वांच्या लक्षात येतं की तिचं अपहरण झालंय. हा प्रसंगदेखील मी अजून विसरू शकत नाही.


     दुर्गा भागवतांच्या ‘आंधळी’ ह्या हेलन केलरच्या जीवनावरच्या पुस्तकाने मला  फारच भारावून टाकलं होतं. मध्यंतरी त्यावर आधारीत ‘ब्लॅक’ हा सिनेमा पाहिला. परंतू पुस्तकाची मोहीनी काही वेगळीच आहे. संस्कारक्षम वयात हेलनच्या जिद्दीचा, जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा माझ्या मनावर फारच परीणाम झाला होता. शारीरिक दृष्ट्या challenged व्यक्तींकडे बघायचा माझा दृष्टीकोन ह्या पुस्तकाने बदलला. अजूनही हे पुस्तक मला मरगळल्या क्षणांना नवीन उभारी देतं.


        माझ्या बालपणीच्या ह्या साथीदारांपैकी बरचसे अजूनही पुस्तकरुपाने मला साथसोबत करतात. जे पुस्तकरूपात नाहीयेत्, तेही स्मृतीरुपाने माझ्याजवळंच आहेत . माझ्या मुलीनेही ह्या माझ्या  मराठी मित्रांची ओळख करून घ्यावी ही माझी ईच्छा अजून पूर्ण झाली नाहीये.


© गीता पलुस्कर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

DDLJ ची जादू - ३० वर्षानंतरही

तारे जमीं पर