तारे जमीं पर

   तारे जमीं पर

© गीता पलुस्कर

नुकताच एक सुंदर चित्रपट बघण्याचा योग आला, तारे जमीं पर. एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही.अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी, ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी चित्रपट बघण्याचं धाडस करते. पुन्हा तो मल्टिप्लेक्समध्ये पाहीला आणि वाईट निघाला तर फारंच पैसे फुकट गेल्याची हळहळ येते, त्यापेक्षा वाट पाहीलेली बरी.परंतू माझेच हे सर्व नियम तोडून मी हे दोन्ही चित्रपट रीलीज झाल्याबरोबर लगेच पाहीले. कारण पूर्वप्रसिद्धीने भितीवर मात केली.

        तारे जमीं पर  हा अमीर खानचा असल्यामुळे तो बघण्याची मला उत्सुकता होतीच. तो मतीमन्द मुलांबद्दल आहे असं वाटलं होतं; पण प्रत्यक्षात तो अगदी वेगळा आढळून आला. डिस्लेक्षिया ह्या मुलांमध्ये आढळून येणाऱ्या समस्येबद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल हा सिनेमा भाष्य करतो. अनेक वर्ष शिक्षणक्षेत्रात काढूनसुद्धा डिस्लेक्षिया ह्या प्रकाराची,तो असतो,यापलीकडे मला काहीच माहिती नव्हती ह्याचं आता मला आश्चर्य वाटतंय.

        कथेचा नायक आहे एक नउ -दहा वर्षाचा मुलगा; तिसरीत शिकणारा. धड लिहिता वाचतादेखील न येणारा, त्यामुळे अभ्यासात मागे पडलेला, नापास होउ घातलेला, सर्वांनी खोड्याळ , मठ्ठ असे शिक्के मारलेला, सतत शिक्षा होवून वर्गाबाहेर उभा. शिक्षेच्या भितीने एक दिवस तो शाळेतून पळून जातो आणि दिवसभर ईकडेतिकडे फिरून संध्याकाळी गुपचूप घरी जातो.ह्याचा पत्ता लागल्यावर शाळेचे शिक्षकही खोलवर जाउन विचार न करता , त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत घालण्याचा सल्ला देउन मोकळे होतात. वडीलही त्याला 'सुधारण्यासाठी' होस्टेलला नेउन टाकतात. ईथेही मूळ प्रॉब्लेम तसाच राहातो. परत मार, शिक्षा, अगणित अपमान, शिवाय आपल्याला आई- वडीलांनी दूर लोटल्याचं दुःख्ख! त्या लहानग्याचं भावजीवन उद्ध्वस्त होउ लागतं. न्यूनगंड, भय, निराशा, अविश्वास, राग. नुसता भावनाकल्लोळ. एका छोट्या जीवाला फार होतं ते सगळं. त्याची चित्रकला, त्याची तरल कल्पनाशक्ती, त्याचा खेळकर आणि खोडकरपणा, सर्व लयाला जाऊ लागतं.

      आणि मग येतो एक नवा कलाशिक्षक, तात्पुरत्या वर्षासाठी (temporary). तो कोणी देव नसतो, पण माणूस नक्कीच असतो. स्वतःही अश्या अडचणीवर मात करून मोठा झालेला, मुलांमध्ये रस असलेला, मुलांना वेळ देणारा, त्यांच्या समस्या समजून घेणारा. तो पालकांना आणि मुख्याध्यापकांना समजावून देतो की हा प्रॉब्लेम म्हणजे मतिमंदत्व नव्हे. आपला कथानायक हा अतिशय तरल कल्पनाशक्ती असलेला एक बुद्धिमान मुलगा असतो. तो उत्तम चित्रकारही असतो. त्याला आकार, अवकाश(space), ह्या संकल्पना थोड्या जड जात असतात. त्यामुळे त्याला आकडे, अक्षरं ओळखायला आणि लिहायला त्रास पडत असतो. मेंदूत थोडा वायरिंगचा प्रॉब्लेम असतो. लहानपणापासून ह्या समस्येकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे त्याला धड लिहिता-वाचताही येत नसतं. परंतू त्याचं जनरल नॉलेज उत्तम असतं. थोड्या प्रयत्नांनंतर तो नक्कीच सुधारणार असतो. आणि तसं होतं.

       आता मला प्रश्न पडतो की अभ्यासात ढ गणल्यागेलेल्या किती मुलांमध्ये हा प्रॉब्लेम असेल? त्याला एक सर मिळाले ज्यांनी त्याला समजून घेतलं, पण असे किती बळी प्राथमिक शिक्षणाच्या वेदीवर जात असतील? समाज आणि मुख्यतः शिक्षक ह्या समस्येबाबत कितपत संवेदनाशील असतात? कितीजणांना डिस्लेक्षिया म्हणजे काय हे माहीत असतं?(मलातरी नव्हतं)

     मध्यांतरानंतरचा सिनेमा थोडा फिल्मी होतो. परंतू तो हिंदी व्यावसायिक सिनेमा असल्यामुळे तेवढं माफ आहे.मध्यवर्ती भूमिकेतील दर्शिल सफरीचं कौतूक करावंस वाटतं. त्याचं ते वर्गात काही न समजणं, स्वप्नरंजन आणि होस्टेलला 'टाकून' दिल्यानंतरची उदासी,सर्व अगदी खरंखुरं वाटतं.

      एक सुन्दर आणि जनजागृती करणारा चित्रपट बनवल्याबद्दल अमीर खानचं हार्दिक अभिनंदन. आणि ह्या कथेवर, समस्येवर चित्रपट बनवण्याचा ध्यास घेउन आठ वर्ष धडपडून तो प्रत्यक्षात आणणाऱ्याअमोल गुप्ते ह्यांचंही हार्दिक अभिनंदन. असेच उत्तमोत्तम चित्रपट पुढेही आमच्यासाठी आणा ही विनंती

© गीता पलुस्कर



टिप्पण्या

Vaishali म्हणाले…
Article खूपच छान लिहीले आहे. मलासुद्धा "तारे ज़मी‍ पर" एक स्तुत्य प्रयत्न वाटला. परन्तु त्याच्या सुधारणेचा प्रवास नेमकेपणाने येणे आवश्यक होते, नक्की काय प्रयत्न केले आणि कशी improvement झाली, हे फक्त एका गाण्यामध्ये सम्पवून टाकले आहे. Commercial film म्हणून असे मुद्दे काढले नाहीत, तर बाकी picture उत्तमच आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

DDLJ ची जादू - ३० वर्षानंतरही

मला आवडलेली पुस्तकं: